राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. सीबीआयने लालूप्रसाद यांना रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी चौकशीसाठी तीन ऑक्टोबरला बोलावले आहे. तर लालूंचे सुपुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही चौकशीसाठी समन्स धाडले आहे. याप्रकरणी आता दोघा पितापुत्रांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तेजस्वींची चार ऑक्टोबर रोजी चौकशी केली जाईल. यापूर्वीही ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी सीबीआयने लालूंच्या पाटणा येथील निवासस्थानी छापा मारला होता.

गुन्ह्याचा कट रचणे, फसवणूक आणि भ्रष्ट्राचाराशी संबंधित इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपानुसार पुरी आणि रांची येथील भारतीय रेल्वेच्या बीएनआर हॉटेलचे नियंत्रण सुरूवातीला आयआरसीटीसीकडे देण्यात आले होते. त्यानंतर या हॉटेलची देखभाल, त्याचे नियंत्रण आणि विकासाचे काम पाटणा येथील सुजाता हॉटेल प्रायव्हेट लि. ला देण्यात आले होते. सुजाता हॉटेलला फायदा पोहोचवण्यासाठी टेंडरच्या अटी शिथील करण्यात आल्या होत्या. याच्या बदल्यात पूर्व पाटणा येथील ३ एकर जमीन नाममात्र दरात डिलाईट मार्केटिंगला देण्यात आली. लालूप्रसाद यादव यांच्या निकटवर्तीयाची ही कंपनी आहे. नंतर ही जमीन लारा प्राजेक्ट्सकडे हस्तांतरित करण्यात आली. या कंपनीचे मालक लालूंच्या कुटुंबीयातील सदस्य आहेत.

बेनामी संपत्ती प्रकरणी लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर पदाचा वापर करत बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाने नुकतेच याप्रकरणी १२ बेनामी संपत्ती सील केल्या आहेत. याप्रकरणी लालूंची कन्या मिसा भारती आणि जावई शैलेश कुमार यांच्यावरही आरोप आहेत. पण यादव कुटुंबीय सुरूवातीपासूनच या आरोपांमागे राजकीय कट असल्याचा दावा करत आहेत.