स्टिंग ऑपरेशनमधील वादग्रस्त सीडी अस्सल असल्याचे सिद्ध

उत्तराखंडमधील वादग्रस्त स्टिंग ऑपरेशनची सीडी अस्सल असल्याचे आढळल्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना सीबीआयने या प्रकरणी चौकशीसाठी पाचारण केले आहे.

हे काँग्रेसच्या बंडखोर आमदारांशी सौदा करण्यासाठी रावत हे दलालांशी बोलत असताना या सीडीत दिसत आहेत. या संबंधात प्राथमिक चौकशीसाठी रावत यांना सोमवारी सीबीआयच्या मुख्यालयात बोलावण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निष्ठा बदलण्यासाठी रावत यांनी आपल्याला अडीच कोटी रुपये देऊ केले आणि नंतर त्यांच्या मंत्र्यांपैकी एकोने १० कोटी रुपये घेऊन आपल्याशी संपर्क साधला, असा आरोप करणाऱ्या एका बंडखोर आमदाराची सीबीआयने चौकशी केली आहे. हे स्टिंग ऑपरेशन करणारे ‘समाचार प्लस’ वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश शर्मा यांची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने तशी शिफारस केल्यानंतर आणि त्यानुसार केंद्र सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. २८ मार्चला रावत यांना शक्तिपरीक्षेला सामोरे जायचे असल्याच्या दोन दिवसांपूर्वी, विधानसभेत शक्तिपरीक्षेदरम्यान पाठिंबा देण्यासाठी रावत यांनी आपल्याला लाच देऊ केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या ९ आमदारांनी केला होता आणि या दाव्याच्या पुष्टय़र्थ ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ जारी केला होता.

एका खासगी वृत्तवाहिनीने तयार केलेल्या आणि बंडखोर काँग्रेस आमदारांनी वितरित केलेल्या या स्टिंग सीडीमुळे राज्यात राजकीय संकट उभे ठाकले होते.

आपल्याविरुद्ध बंड करणाऱ्या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी रावत हे पत्रकारांशी सौदा करत असल्याचे या सीडीमध्ये दाखवले होते.