सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशनकडून cbse घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ठरलेल्या वेळेनुसार लागणार आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हे निकाल जाहीर करण्यात येतील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट आहे.

गुणांच्या पुनर्मुल्यांकनासंदर्भात काही दिवसांपासून वाद चालू आहे. याबाबत बोर्डाकडून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र चालू वर्षाच्या परीक्षांचे निकाल काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. असे असताना सीबीएसई आपल्या धोरणांतील बदल पुढील वर्षी का करत नाही, असा प्रश्नही दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीएसईला विचारला आहे.

या निकालाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरीही येत्या २ ते ३ दिवसांत हे निकाल लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सीबीएसईचे दहावीचे निकाल २१ मे रोजी तर १२ वीचे निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही हे निकाल वेळेत लावण्यात येतील.

यावर्षी देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र तरीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी हे निकाल वेळेत लावण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यावर्षी देशभरातून १०.९८ लाख विद्यार्थी सीबीएसईकडून बारावीच्या परीक्षेला बसले होते. यातील सर्वाधिक म्हणजेच अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी दिल्ली केंद्रातून होते.