सीबीएसईच्या १२ वी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. आज (रविवारी) सकाळी वेबसाईटवर हा निकाल जाहीर झाला. नोएडा येथील अमिटी इंटरनॅशनल स्कूलमधील रक्षा गोपाळ हिने ९९.६ टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर चंदिगडमधील भूमी सावंत हिने ९९.४ टक्के मिळवत दुसऱ्या आणि चंदिगड येथील आदित्य जैन याने ९९.२ टक्के मिळवत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.

केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. हा निकाल २४ मे रोजी लागणे अपेक्षित होते. मात्र गुणांच्या पुनर्मुल्यांकनाचा वाद दिल्ली उच्च न्यायालयात चालू असल्याने निकाल लागण्यास काहीसा उशीर झाला.

९ मार्च ते २९ एप्रिलदरम्यान झालेल्या या परीक्षेला देशभरातून १०,९८,८९१ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ६,३८,८६५ मुली तर ४,६०,०२६ मुले होती. एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच २,५८,३२१ विद्यार्थी एकट्या दिल्ली केंद्रातील होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी २,४९७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

यंदा एकूण निकाल ८२ टक्के लागल्याचे बोर्डाने सांगितले असून मागील वर्षी ८३ टक्के विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले होते. विद्यार्थ्यांना आपले निकाल सीबीएसईच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

विद्यार्थ्यांनी हे पहाणे महत्त्वाचे…
१. प्रत्येक विषयात पास होण्यासाठी त्या विषयात एकूण निकालाच्या ३३ टक्के गुण असण्याची आवश्यकता आहे.
२. प्रत्येक विषयांचे एकूण गुण वेगवेगळे असल्याने विद्यार्थी वरीलप्रमाणे आपले गुण मोजू शकतात.
३. पास होण्यासाठी विद्यार्थ्याला अंतर्गत आणि प्रात्यक्षिक परीक्षेत ३३ टक्के आणि बोर्डाच्या मुख्य परीक्षेत ३३ टक्के इतके गुण असणे आवश्यक आहे.
४. कामाचा अनुभव, कला, क्रिडा आणि आरोग्य शिक्षण या विषयांमध्ये ग्रेडपद्धतीने मूल्यांकन केले जाणार आहे.
५. दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेत हे विषय सोडवता येणार आहेत. तरीही पास न झाल्यास या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी पुन्हा १२वीच्या परीक्षेला बसावे लागेल.