केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये रक्षा गोपाळ हिने कला शाखेमधून देशात पहिली आली आहे. ३ विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत तर इतर दोन विषयात तिने ९९ मार्क मिळवत तिने पहिल्या क्रमांकावर मोहोर उमटविली आहे. दुसऱ्या क्रमांकावरही चंदिगडमधील भूमी सावंत हिने ९९.४ टक्के मिळवत मुलींचे परीक्षांमधील स्थान कायम राखले आहे.

९९ टक्के मिळविणाऱ्या रक्षाची गुणपत्रिका सोशल मिडियावर व्हायरल होत असून इतके गुण मिळविणाऱ्या या विद्यार्थिनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. इंग्रजी, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात रक्षाने १०० पैकी १०० गुण मिळविले असून इतिहास आणि मानसशास्त्रात ९९ गुण मिळवले आहेत. याशिवाय कामाचा अनुभव, शारीरिक आणि आरोग्य शिक्षण तसेच सामान्य ज्ञान विषयातही एवन ग्रेड मिळविली आहे. तिने नोएडा येथील अमिटी इंटरनॅशनल स्कूलमधून १२ वीची परीक्षा दिली होती.

आपल्या या निकालाबाबत रक्षा म्हणाली, ‘मी चांगल्या गुणांनी पास होईन अशी खात्री होती. मात्र देशात पहिली येईन असे वाटले नव्हते. त्यामुळे खूप आनंद झाला आहे. कला शाखेतील विद्यार्थ्याला इतके गुण मिळू शकत नाहीत या संकल्पनेला छेद मिळाला आहे.’ यापुढे आपल्याला राज्यशास्त्रात शिक्षण घ्यायचे असल्याचेही तिने सांगितले. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर आपण केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करणार असल्याचेही तिने सांगितले.

मागील वर्षी सुक्रीती गुप्ता हीने ९९.४ टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकाविला होता. यंदाचा सीबीएसईचा १२वीचा निकाल ८२ टक्के लागला असून तो मागील वर्षीपेक्षा एका टक्क्याने कमी आहे.