संबधित घटकांशी मंडळ चर्चा करणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात तूर्तास कोणताही बदल केला जाणार नसल्याचे सांगत वेळापत्रकात बदल करताना सर्व संबंधित घटकांचा विचार करीत त्यांच्याशी  चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले. यासाठी शाळांसोबतदेखील चर्चा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

पेपर तपासणी प्रक्रिय सदोष असल्याच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी व तपासणी प्रक्रियेला अतिरिक्त वेळ उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सीबीएसई’ मंडळ दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक महिना आगोदर घेण्याच्या विचारात असल्यामुळे याबाबत विविध शाळांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती.

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे योग्य प्रकारे मूल्यामापन करून प्रक्रिया अधिक दर्जेदार करणे हा आमचा उद्देश आहे, परंतु सर्व संबंधित घटकांशी चर्चा केल्याशिवाय मंडळ परीक्षा काळात बदल करणार नसल्याचे वरिष्ठ ‘सीबीएसई’ अधिकारी यांनी सांगितले.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा या दरवर्षी मार्च महिन्यात घेण्यात येतात, परंतु या परीक्षा एक महिना आगोदर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात  घेण्याचा विचार मंडळाकडून केला जात आहे.

पेपर तपासणीची प्रक्रिया सदोष असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे या प्रक्रियेतील दोष शोधून त्यावर उपाय सुचविण्यासाठी मंडळाकडून दोन विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. परीक्षांच्या विविध प्रक्रिया आणि प्रशासकीय तयारीचा ही संकल्पना अमलात आणण्यासाठी विचार केला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.