केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षेत यंदा कॉपीचे प्रमाण दुप्पट होते, अशी माहिती पुढे आली आहे.

सीबीएसई अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी संपूर्ण देशात ५६ कॉपीचे प्रकार उघडकीस आले होते. यंदा ११९ प्रकरणे घडली. राजस्थानमधील अजमेर येथे कॉपीचे प्रमाण अधिक म्हणजे ५४ होते. मागील वर्षी कॉपीच्या केवळ तीन घटना घडल्या होत्या. दिल्लीतील कॉपीचे प्रमाण १२ वरून ८ असे कमी झाले आहे. तर गुवाहाटीत हे प्रमाण ९ वरून २७ असे वाढले.

उत्तर प्रदेशातील अहालाबाद येथे कॉपीच्या घटना सात वरून तीन अशा कमी झाल्या आहेत. तर डेहराडूनमध्ये हा आकडा वाढला आहे. चंदीगडमधील पंचकुला येथे कॉपीच्या आठ घटना घडल्या आहेत. काटेकोर तपासणीमुळे कॉपीच्या घटनांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सीबीएसईकडून गुणपत्रिकेवर अतिरिक्त गुणांचा उल्लेख नाही

उत्तीर्ण होण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असणाऱ्यांना वाढीव गुण देण्यात आले असले तरी सीबीएसईने (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) गुणपत्रिकेवर त्याचा उल्लेख केलेला नाही.

गुण नियंत्रण धोरण रद्द केल्यानंतर सीबीएसईने उत्तीर्ण होण्यासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त गुणांचा उल्लेख गुणपत्रिकेवर करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीएसईच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर ही पद्धत कायम ठेवण्यात आली. या प्रकरणी अंतिम निकाल आल्याशिवाय आम्ही अतिरिक्त गुणांचा उल्लेख गुणपत्रिकेवर करणार नाही, असे सीबीएसई अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अतिरिक्त गुणांच्या गुणपत्रिकेवरील उल्लेखामुळे काही राज्यांना धास्ती वाटत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील तो नकारात्मक शिक्काच ठरू शकतो, असेही या राज्यांना वाटते.