सीमाभागात अशांतता कायम राहावी यासाठी सतत भारताच्या कुरापत्या काढणाऱ्या पाकिस्तानने शुक्रवारी पुन्हा एकदा जम्मू क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात व तोफगोळ्यांच्या माऱ्यात तीन नागरिक मृत्युमुखी पडले तर १७ जण जखमी झाले. पाकिस्तानच्या या आगळिकीला भारताने नेहमीप्रमाणेच चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानी रेंजर्सनी शुक्रवारी पहाटे जम्मू क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील आर. एस. पुरा व अर्णिया भागात गोळीबार सुरू केला. सुरुवातीला गोळीबाराचे प्रमाण कमी होते. मात्र, त्यानंतर अचानक माऱ्यात वाढ झाली. दुपारी दीडच्या सुमारास आर. एस. पुरा भागातील किशनपूर, जोरा फॉर्म, जुनगू चाक, नवापिंड, घरना, सिया, अब्दुलियान आणि चंदू चाक या गावांवर पाकिस्तानी रेंजर्सनी तोफगोळ्यांचा मारा केला. तर सायंकाळी साडेचारच्या सुमारास अर्णिया भागातील गावांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात आर. एस. पुरा भागात दोन तर अर्णियात एक असे एकूण तीन नागरिक मृत्युमुखी पडले तर १७ जण जखमी झाले. पाकिस्तानी रेंजर्सच्या या आगळिकीला सीमा सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. या वर्षभरात आतापर्यंत पाकने २४५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

पाकच्या उलटय़ा बोंबा
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तसेच आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने भारतच शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त टीसीए राघवन यांना पाचारण करून पाकिस्तानने भरताच्या या कृतीचा निषेध केला! भारताने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत पाकिस्तानचे सहा नागरिक ठार तर ४७ जण जखमी झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. हरपाल व सियालकोट या भागांत भारताकडून गोळीबार झाल्याचा आरोपही पाकिस्तानने यावेळी केला.

पाकला अमेरिकेची समज
पाकिस्तानने त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत त्यामुळे गंभीर परिणामांचा इशारा वेळोवेळी भारताला दिला असला तरी हे वर्तन योग्य नाही, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानला ही समज दिली आहे. ते म्हणाले की, भारत-पाकिस्तान यांच्यात अनेक विषयांवर वाद आहेत. त्यांनी ते चर्चेद्वारे सोडवावेत. पाकिस्तानने अण्वस्त्रधारी देश असल्याच्या गमजा मारत सतत धमक्या देऊन तणाव वाढवू नये.
‘भारतापासूनच पाकला खरा धोका’
भारत हाच आम्हाला एकमेव बाह्य़ धोका आहे, तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द केल्याने दोन्ही देशातील संबंध आणखी नाजूक झाले आहेत, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. सिनेटच्या संरक्षण समितीचे प्रमुख मुशाहिद हुसेन सय्यद यांच्या नेतृत्वाखालील समितीने लष्करी मुख्यालयास रावळपिंडी येथे भेट दिली. त्यावेळी जनरल राशाद महमूद व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारत हाच पाकिस्तानला खरा धोका असल्याचे सांगितले.