पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. ऑटोमॅटिक रायफल्स आणि तोफगोळ्यांचा वापर करत पाकिस्तानने भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारताने तातडीने प्रत्युत्तर दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

भारतीय सैन्याने २९ सप्टेंबरला एलओसी ओलांडत पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले होते. या कारवाई दरम्यान भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर वारंवार पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून आतापर्यंत तीसवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

मंगळवारी पाकिस्तानी सैन्याने तोफगोळ्यांच्या सहाय्याने भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबारदेखील करण्यात आला होता. रात्री ८.३० ते १.३० दरम्यान पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. तर १६ ऑक्टोबरला पाकिस्तानने दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.