चित्रपटाचे भवितव्य ठरविणाऱया सेन्सॉर बोर्डालाही लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) पथकाने केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश कुमार यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
चित्रपटसृष्टीच्या स्वप्ननगरीतील सर्वात मोठे स्कॅण्डल सीबीआयने उघडकीस आणले आहे. एका मध्यस्थाच्या सहाय्याने राकेश कुमार यांनी छत्तीसगढच्या एका चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारली असल्याचा आरोप राकेश कुमार यांच्यावर आहे.
इतकेच नव्हे, तर बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटाशी संबंधितांनी देखील राकेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ‘किक’ चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक साजीद नाडियादवाला यांनी व्यक्तीश: भेट घेईपर्यंत सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देण्यास राकेश कुमार यांनी मुद्दाम विलंब केल्याचे समजते.
राकेश कुमार ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ अर्थात सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सेन्सॉर बोर्डाने सात महिन्यांपूर्वीच त्यांची नेमणूक केली. यातील आश्चर्यकारक बाब म्हणजे आधी रेल्वे विभागात काम करणाऱ्या राकेश कुमार यांना थेट सेन्सॉर बोर्डाच्या मोठ्या हुद्द्यावर प्रमोशन दिले गेले. सेन्सॉर बोर्डाचे सीईओ बनण्याआधी राकेश कुमार हे वडोदरा रेल्वे विभागात कार्यरत होते.
कुमार यांच्यावरील आरोपानुसार, छत्तीसगढी भाषेतील ‘मोर डौकी के बिहाव’ या शिर्षकाच्या चित्रपटाला सेन्सॉरचे प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी कुमार यांनी लाच घेतली. नियमांनुसार, चित्रपटात प्राण्यांचा वापर करण्यात आला असेल, तर सेन्सॉर बोर्डाच्याआधी ‘अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यात कमीतकमी दोन महिन्यांचा कालावधी जातो परंतु, त्याआधीच कुमार यांनी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देण्यास तयारी दर्शविली.