‘उडता पंजाब’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनाआधीच त्यातील काही दृश्यांवरून वादाच्या भोवऱयात सापडलेला असताना आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. पंजाबमध्ये ड्रग्जची गंभीर समस्या असून, केवळ चित्रपटातील दृश्यांवर बंदी आणून पंजाबमधील समस्या सुटणार नाहीत. त्यामुळे सरकारने परिस्थितीचा स्विकार केलाच पाहिजे आणि उपाय शोधून काढावेत, असे ट्विट राहुल गांधी यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर करण्यात आले आहे.

मला उत्तर कोरियात राहत असल्यासारखे वाटतेय; अनुराग कश्यपची संतप्त प्रतिक्रिया 

दिग्दर्शक अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ चित्रपटातील तब्बल ८९ दृश्यांना कात्री लावण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या या आदेशाविरोधात बॉलीवूडकर एकत्र येऊन निषेध व्यक्त करत आहेत. सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण उत्तर कोरियातील हुकुमशाही राजवटीत राहतोय की काय असा प्रश्न उपस्थित करत अनुरागने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता या वादात थेट राहुल गांधी यांनी उडी घेतल्याने ‘उडता पंजाब’ चित्रपटाचा वाद आणखी तापण्याची चिन्हे आहेत.