अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ५५३ कोटी रुपयांची मदत देण्यास मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. राज्य सरकारने एकूण ६५१ कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली होती, त्यापैकी ८५ टक्के रक्कम केंद्राने मंजूर केली असून, उर्वरित रक्कम राज्यास द्यावी लागणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विस्तृत माहिती केंद्राला कळवल्यानंतर तात्काळ निधी वितरित केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिल्याचे खडसे म्हणाले.
राज्य सरकारने केंद्राला दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण १ लाख ८६ हजार हेक्टर जमिनीवरील फळबागांचे नुकसान झाले होते. ज्यात प्रामुख्याने केळी, संत्री, डाळिंब व द्राक्षबागांचा समावेश होता. अनेक शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले होते. राज्याने मागितलेल्या मदतीपैकी ८५ टक्के रक्कम देण्यास कृषी मंत्रालयाने परवानगी दिल्याचे खडसे म्हणाले.
ते म्हणाले की, राज्यभरातील दुष्काळग्रस्त स्थितीचा अंदाज आत्ताच सांगणे अवघड आहे. अद्याप उन्हाळा सुरू झालेला नाही, परंतु अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने आत्तापासूनच १२३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून मदत सुरू केली आहे. मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये, तर विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला व जळगावमधील तीन जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळग्रस्त स्थिती आहे.

*प्रति हेक्टर ३५ हजार रुपये मदत देण्यात येईल. ही रक्कम प्रत्येकी दोन हेक्टपर्यंत असेल.
*केवळ फळबागा असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असली तरी अद्याप संपूर्ण राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यात आलेला नाही.
*सर्व भागांची पैसैवारी घोषित झाल्यानंतर पुढील महिन्यात मुख्यमंत्री सहकारी मंत्र्यांसह पंतप्रधानांची भेट घेणार.