सोशल मीडियावर सैन्य दलाच्या व निमलष्करी दलाच्या जवानांनी तक्रार उपस्थित केल्यानंतर देशात एकच गहजब उडाला होता. त्यामुळे केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाने (सीएपीएफ) जवानांच्या तक्रारींसाठी मोबाइल अॅप तयार करण्याची योजना बनवली आहे. पण दुसरीकडे मात्र सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कर्तव्यावर असताना मोबाइल फोन वापरण्यावर बंदी घातली आहे. कर्तव्यावर असताना एकाही कॉन्स्टेबलने मोबाइल फोन घेऊन जाऊ नये याची जबाबदारी सर्व कंपनीच्या कमांडरवर टाकण्यात आली आहे. यापूर्वीही कॉन्स्टेबलला मोबाइल फोन जवळ बाळगण्याची परवानगी नव्हती. परंतु या नियमाचे सक्तीने पालन केले जात नसे. परंतु काही दिवसांपूर्वी बीएसएफचे जवान तेजबहादूर यादव यांनी जेवणाच्या तक्रारीचा व्हिडिओ जारी केल्यानंतर हा निर्णय सक्तीने अंमलात आणायचे निश्चित केले आहे.

केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी हे ७.२ लाख सीएपीएफ शिपायांसाठी अॅप तयार करण्यासाठी सल्ला घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकल्प एनआयसीद्वारे तयार करण्यात येणार आहे. हे अॅप डाऊनलोडसाठी लवकरच उपलब्ध होईल. जर निमलष्करी दलांनी कर्तव्यावर असताना फोन नेण्यास प्रतिबंध लादला तर जवानांना कामावरून परतल्यानंतर अॅपच्या माध्यमातून आपल्या तक्रारी दाखल करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु यात त्या जवानाला आपल्या वरिष्ठांसमोर फोटो किंवा रेकॉर्डिंग सादर करता येणार नाही, अशी कमतरता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या नव्या अॅपमध्ये गोपनीयतेसाठी नवे सिक्युरिटी फिचर्स असतील. या प्रकल्पासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्याबरोबर सर्व जवानांचे मोबाइल क्रमांक जमा करण्यासही सांगितले आहे. या अॅपमध्ये एक फिल्टर असेल. ज्यामुळे मंत्रालयातून पुष्टी मिळाल्यानंतर तक्रार थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर पाठवण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.