नफेखोरांवर धडक कारवाईचे केंद्राचे आदेश

सणासुदीला डाळींचे वाढलेले भाव आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने परवानाधारक, अन्न प्रक्रियाधारक, आयातदार, निर्यातदारांना साठय़ाच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत. त्यामुळे साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक कारवाईचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत.
डाळींची उपलब्धता वाढवावी यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अनुसार आदेश काढून डाळींच्या साठेबाजीला मर्यादा घातली आहे. अनेकदा अन्न प्रक्रिया उत्पादक, आयात-निर्यातदार डाळींचा साठा करून ठेवतात व किरकोळ विक्रेतेही साठा करतात. मंत्रिमंडळ सचिवांनी दरवाढीचा नुकताच आढावा घेतला. त्यांनी सर्व खात्यांना विशेषत: डाळीच्या साठेबाजीवर लक्ष ठेवण्यास सांगितले; त्यातही डाळींवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यांनी साठेबाजांवर कारवाई करून डाळीची दरवाढ रोखावी असेही सांगण्यात आले.

देशांतर्गत उत्पादन २० लाख टनांनी घसरल्याने डाळींचे भाव गेल्या काही महिन्यात वाढले. २०१४-१५ मध्ये डाळींचे उत्पादन १७.२० दशलक्ष टन झाले होते. सध्या देशात तूरडाळ १९० रू किलो आहे, गेल्या वर्षी हा भाव ८५ रू किलो होता. उडीद डाळ १९० रू किलो आहे. गेल्या वर्षी ती १०० रू किलो होती. केंद्रीय भंडार व मदर डेअरीच्या सफल दुकानांमधून आयात तूरडाळ दिल्लीत १२० ते १३० रू किलोने विकली जात आहे. तामिळनाडू व आंध्र प्रदेशने आयात डाळी विकण्यास सुरूवात केली आहे. सरकारने ५ हजार टन तूर डाळ आयात केली असून आणखी २००० टन डाळीसाठी निविदा मागवल्या आहेत. गेल्या आठवडय़ात सरकारने शेतकऱ्यांकडून ४० हजार टन तूर व उडीद डाळ विकत घेतली असून त्याचा राखीव साठा केला जाणार आहे.

पापड उद्योग संकटात
चेन्नई : उडीद डाळीचे भाव वाढल्यामुळे देशभरातच आता पापड उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. उडीद डाळीचा भाव गेल्या वर्षीचा भाव क्विंटलला ६००० रुपये होता. यंदा तो १८ हजार रूपयांवर गेला आहे. तामिळनाडूत ७५० कोटींचा पापड उद्योग आहे. त्यात साडेतीन लाख लोक काम करतात. या व्यापारात अजून पाच हजार कंपन्या आहेत. तसेच महिलांचे प्रमाण ७५ टक्के असून त्यांना रोजगार मिळाला आहे ऑनलाईन व्यापारामुळे उत्पादक साठेबाजी करीत असून त्यामुळे उडीद डाळीचे दर वाढले आहेत, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. वर्षांला ३० कंटेनर भरून १८ हजार किलो पापड जहाजांनी चेन्नई आणि मुंबई येथून परदेशात जातात, परंतु प्रमाण केवळ पाच-सहा कंटेनरवर आले आहे.