यंदा देशभरात झालेल्या कांद्याच्या विक्रमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी शेतकऱ्यांकडून १५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. विक्रमी उत्पादनामुळे सध्या बाजारपेठेत मोठ्याप्रमाणावर कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याच्यादृष्टीने सरकारने शेतकऱ्यांकडून बाजारभावाने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एकुण उत्पादनाच्या तुलनेत सरकारची ही खरेदी नगण्य असल्याने शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फारसा फायदा होणार नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यंदा महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन १३ हजार टनांनी वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याचे भाव गडगडण्याच्या स्थितीत आहेत. नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत सध्या कांद्याचा दर प्रतिकिलो ३ रूपये इतका आहे. विक्रीचा भाव खालावल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा तसाच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा देण्याच्यादृष्टीने केंद्राने नाशिक जिल्ह्यापासून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.