राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त भागातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी १ हजार २६९ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. शेतक-यांना मदत दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

दिल्लीत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कृषीमंत्री राधामोहन सिंह, गृहराज्यमंत्री किरेन रिजीज, केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या पथकाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली होती.  या पथकाने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारने राज्यासाठी १,२६९ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. यातील ५८९.४६ कोटी रुपये खरीप पिकांच्या तर ६७९.५४ कोटी रुपये रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आले आहे.

राज्यातील २९ हजार ६५ गावांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्या गावांमध्ये विविध उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. यानंतर नव्याने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेल्या ११ हजार गावांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे पुरवणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळी स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती.  राज्याची ही मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित होती.  बुधवारी बैठकीत पाहणी अहवालावर विचारमंथन केल्यावर राज्याला मदत जाहीर करण्यात आली आहे.