राष्ट्रपतीपदाच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने मीरा कुमार यांना देण्यात आलेली एक्स श्रेणीतील सुरक्षेचे समीक्षण करून यामध्ये वाढ करत झेड प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवली आहे. विरोधी पक्षांकडून गुरूवारी मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार झेड प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर आता मीरा कुमार यांच्याबरोबर २४ तास दिल्ली पोलिसांचे सशस्त्र सुरक्षा दलाचे जवान असतील.

यूपीए-२ मधील मनमोहन सिंग सरकारच्या काळात मीरा कुमार या पाच वर्षे लोकसभेच्या अध्यक्ष होत्या. सध्या त्यांना एक्स श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात येते. या श्रेणीची सुरक्षा असलेल्या व्यक्तींना अर्ध स्वंयचलित रायफल असलेला एक सुरक्षा कर्मचारी पुरवण्यात येतो. झेड प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर मीरा कुमार यांच्याबरोबर आता ३६ सुरक्षा कर्मचारी असतील.

यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर केली होती. कोविंद यांनी शुक्रवारी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. संसद भवनात येऊन त्यांनी लोकसभेचे महासचिव यांच्याकडे आपला अर्ज सादर केला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशिवाय अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते. कोविंद यांच्या अर्जावर पंतप्रधान मोदींनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे.