केंद्रीय माहिती आयोगाची दिल्ली पोलिसांकडे विचारणा

महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित तीन फरार आरोपींना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी काय प्रयत्न केले, अशी विचारणा केंद्रीय माहिती आयोगाने केली आहे.

ओडिशास्थित हेमंत पांडा यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार याचिकेवर देशातील पारदर्शक कारभारावर लक्ष ठेवणााऱ्या सीआयसीने दिल्ली पोलिसांकडे याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

गंगाधर दहावटे, सूर्य देव शर्मा आणि गंगाधर यादव या तीन फरार आरोपींना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी काय प्रयत्न केले, याची माहिती पांडा यांना हवी आहे.

पांडा एक संशोधक असून, महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित अभ्यास करण्यास इच्छुक असल्याचे पांडा यांनी आयोगाला सांगितले आहे. महात्मा गांधी यांची हत्या उजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता नथुराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ ला केली होती.

पांडा यांनी याचिकेत तीन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. गांधी हत्या प्रकरणामध्ये फरार तीन आरोपींना अटक करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, अपिलातील अन्य दोन आरोपींना मुक्त करण्याचे कारण? आणि अंतिम आरोपपत्र आणि गोडसे प्रकरणामध्ये कारवाईसाठी देण्यात आलेल्या आदेशाची प्रत नोंदीमध्ये का नाही?, असे प्रश्न पांडा यांनी उपस्थित केले आहेत.

गोडसेवरील कारवाईच्या आदेशाची प्रत गहाळ

मी एनआयएने संग्रहित केलेल्या पुराव्यांचा अभ्यास केला होता. मात्र यामध्ये दोन महत्त्वाची आढळून आली नाहीत. दिल्ली पोलिसांकडून तयार करण्यात आलेले अंतिम आरोपपत्र आणि गोडसेच्या विरोधात कारवाईचे आदेश ही कागदपत्रे आढळून आली नसल्याचे त्यांनी सांगितले.