रोहित वेमुला प्रकरणानंतर केंद्राला जाग
हैदराबाद विद्यापीठात दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणी वादंग झाल्यानंतर वंचित गटातील विद्यार्थ्यांबाबत भेदभावाची भूमिका घेतली जात असेल तर ती संपवण्यासाठी केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक १८ फेब्रुवारीला मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बोलावली आहे.
मंत्रालयाने दिल्लीसह सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंना बोलावले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या टीकेची धार कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणात विरोधकांनी केंद्रीय मंत्री बंदारू दत्तात्रेय व मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यावर आरोप केले आहेत. या आधी सरकारने शैक्षणिक संस्थांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक वंचितांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी काही शैक्षणिक प्रशासकांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे आदेश विद्यापीठांना देण्यात आले होते. कुलगुरू व प्रशासकांनी विद्यार्थ्यांबाबत संवेदनशील धोरण ठेवावे असे सरकारने म्हटले होते. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात १७ जानेवारीला दलित विद्यार्थी वेमुला याने आत्महत्या केल्यानंतर अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास विद्यार्थ्यांना उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये येत असलेल्या अडचणींचा प्रश्न जास्त प्रकर्षांने सामोरा आला आहे.