उन्हाळ्यातील वाढते तापमान अंग भाजून काढत असतानाच, वीजेच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे दिल्लीकर सध्या जेरीस आले आहेत. एकीकडे तापमानातील प्रचंड वाढ आणि दुसरीकडे सतत खंडीत होणार वीजपुरवठा अशा दुहेरी समस्येशी दिल्लीतील लोक झुंजत आहेत. या समस्येचे खापर केंद्राने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री यांच्या डोक्यावर फोडले आहे. शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे दिल्लीवर वीजपुरवठ्याचे गंभीर संकट ओढवल्याचे केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्र्यांच्या काळातील सरकारी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर असलेला धोरण लकवा आणि चुकीच्या निर्णय या कारणांमुळेच राज्यापुढे उर्जेच्या अनेक समस्या उभ्या राहिल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले. गेल्या दशकभरापासून दिल्ली शहाराबाबत दुरदृष्टी आणि योजनापूर्वक असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. पायाभूत सुविधेच्या क्षेत्रात गुंतवणूक आणि योजनाक्षमतेचा असणारा अभाव हे घटक आजच्या परिस्थितीसाठी कारणीभूत असल्याचेसुद्धा केंद्रीय उर्जामंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. काही दिवसांपूर्वी दिल्लीत आलेल्या वादळामुळे वीजवाहक तारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे दिल्लीतील अनेक भागांमध्ये सध्या एक ते सहा तासापर्यंत वीज खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत.