जपान आणि चीनमधील समुद्रात असलेल्या वादग्रस्त बेटांच्या स्वामित्वावरून उभय देशांतील तणाव अधिकच वाढत असून चीनने तेथे सागरी गस्त घालणाऱ्या आपल्या युद्धनौकेला जोड म्हणून हवाई गस्तीसाठी लढाऊ विमान पाठविल्याने जपान संतप्त झाला आहे. जपाननेही आपली एफ-१५ लढाऊ जेट विमाने या बेटांच्या संरक्षणासाठी तैनात केली आहेत.
१८९५ पासून या बहुतांश निर्मनुष्य बेटाचा ताबा जपानकडे होता. १९४५ ते १९७२ या कालावधीत अमेरिकेच्या ताब्यात ती बेटे होती. १९७१ मध्ये अमेरिकेने जपानशी करार करून ती बेटे जपानकडे दिली. त्याचवेळी ही बेटे मुळात आपली आहेत, असा दावा चीनने केला आणि तेव्हापासून या बेटांवर उभय देश आपला हक्क सांगत आहेत. चीन हक्क सांगत असला तरी तेथे प्रशासकीय अंमल जपाननेच प्रस्थापित केला आहे. चीनने गेल्या वर्षांपर्यंत त्याला फारशी हरकत घेतली नव्हती मात्र जपानने काही बेटे अधिकृतपणे विकत घेतल्यानंतर चीन आक्रमकतेने या बेटांवर हक्क सांगत आहे.
चीनची वाय-१२ विमाने आमच्या हवाई हद्दीत प्रवेश करीत असल्याने आम्हीही तात्काळ आमची लढाऊ विमाने सज्ज केली आहेत, असे जपानच्या लष्कराधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सांगितले. जपानच्या युद्धनौकांनी आपल्या सागरी हद्दीत प्रवेश केला असून त्यांनी तात्काळ माघारी फिरावे, असा इशारा चीननेही दिला आहे.
जपानमध्ये या बेटांना सेन्काकु म्हणतात तर चीनमध्ये दायोउ म्हणून त्यांचा उल्लेख होतो. बेटांवरील लोकांना हाताशी धरून दोन्ही देश एकमेकांविरुद्ध आंदोलनही करीत आहेत.