‘मन की बात’मधील चॅम्पियनने सध्या मौनव्रत धारण केलंय, असा टोमणा सोमवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारला. जोपर्यंत मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाही, तोपर्यंत संसदेतील चर्चेला काहीही अर्थ नसल्याचे सांगत यापुढेही कॉंग्रेस कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करणार नसल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले.
कॉंग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये बोलताना सोनिया गांधी यांनी थेट मोदींवर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘चर्चा आधी, कृती नंतर’ हे भाजपचे धोरण कोणत्याही स्थितीत स्वीकारार्ह नाही. आम्ही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. पण सरकार संबंधित मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करण्याच्या तयारीत नाही. आज आम्हाला जे संसदीय वर्तणुकीबद्दल शिकवत आहेत, ते विरोधामध्ये असताना त्यांनीही संसदेचे कामकाज बंद पाडण्याचेच काम केले होते.
कालपर्यंत दोन्ही सभागृहात गोंधळ घालणारेच आज एकदम चर्चेबद्दल बोलायला लागले असल्याची टीका त्यांनी केली. आधी राजीनामा, मगच चर्चा या सूत्राचे लेखक भाजपचेच नेते असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, काहीजणांना स्मृतीभ्रंशाचा आजार असतो आणि त्यामुळेच आम्हाला सातत्याने त्यांच्याच गोष्टी त्यांना आठवण करून द्याव्या लागतात.