काही दिवसांपूर्वी गुगलने मोठ्या पगाराची नोकरी देऊ केल्यामुळे चंदिगढमधील हर्षित शर्मा हा तरूण प्रचंड चर्चेत आला होता. मात्र, आता या प्रकरणात काही नवीन खुलासे समोर आले आहेत. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने गुगलशी संपर्क साधला तेव्हा आम्ही अशी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे गुगलने सांगितले. याशिवाय, हर्षितला गुगलने इतक्या मोठ्या पगाराची नोकरी दिल्याची साधी माहितीही हरियाणा सरकारला नव्हती. अखेर या प्रकरणाचा सोशल मीडियावर गाजावाजा झाल्यानंतर चंदिगढच्या शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर गुगलने हर्षितला १ कोटी ४४ लाख रुपयांच्या गलेलठ्ठ पगाराची ऑफर दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. सरकारी महाविद्यालयात आयटीचं शिक्षण घेणाऱ्या हर्षितची गुगलकडून ग्राफिक डिझायनर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. तो पुढील आठवड्यात गुगलमध्ये रुजू होणार आहे. त्याला दरमहा ४ लाख रुपये भत्ता देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षित कंपनीत ग्राफिक्स डिझायनर म्हणून रुजू होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. विशेष म्हणजे हर्षितनेही या सगळ्याला दुजोरा देत आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल आनंद व्यक्त केला होता. गुगलकडून मला कधी नोकरीची संधी चालून येईल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, असे त्याने म्हटले होते. मात्र, त्याच्याशी पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याचा फोन बंद होता. यापूर्वी डिजीटल इंडिया मोहिमेत हर्षितने ७ हजार रुपयांचे बक्षिस जिंकले होते.

याशिवाय, प्रसारमाध्यमांकडून हर्षित शिकत असलेल्या गव्हर्नमेंट मॉडेल सिनिअर सेकंडरी शाळेच्या मुख्याधापकांशीही संपर्क साधण्यात आला. तेव्हा त्यांनी म्हटले की, एका अधिकाऱ्याने हर्षितला गुगलची जॉब ऑफर मिळाल्याची माहिती दिली. हा मुलगा आमच्या शाळेतून यंदाच्याच वर्षी उत्तीर्ण होऊन बाहेर पडला आहे. त्यानेच स्वत: शाळेत येऊन ही माहिती दिली. त्याने व्हॉट्स अॅपवर ऑफर लेटरही पाठवलं होते, पण ते नंतर माझ्याकडून डीलिट झाले. ते पत्र मिळताच मी तुम्हाला देईन, असे मुख्याधापक इंद्रा बेनीवाल यांनी सांगितले.