तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी अटक झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकासला वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याचे हरयाणा पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

विकास बराला (२३) आणि त्याचा मित्र आशिष कुमार (२७) या दोघांनी मद्यधूंद अवस्थेत कारमधून एका तरुणीचा पाठलाग केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती. तरुणीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली. चौकशीत एक आरोपी हा भाजप नेत्याचा मुलगा असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी कारवाई केली असली तरी आता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आम्ही घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मार्गावर एकूण नऊ सीसीटीव्ही कॅमेरे होते. मात्र ते बंद अवस्थेत होते अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सतीशकुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. एवढ्या गंभीर गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळू नये हे आश्चर्यकारकच आहे. आरोपींना वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा पोलीस खात्यातच रंगली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीनावर सोडूनही दिले.

दरम्यान, या घटनेवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसने हरयाणामधील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. चंदीगढ पोलीस हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतात. केंद्र सरकार भाजप प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला. पोलीस उप अधीक्षकांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. भाजप सरकार या प्रकरणाची अशा पद्धतीने चौकशी करणार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या प्रकरणावर देशाला उत्तर दिले पाहिजे अशी मागणीच त्यांनी केली.