भारतीय सीमा चुकून ओलांडल्याने पाकिस्तानच्या हाती सापडलेला भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांना सोडविण्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. मात्र, भांबावलेल्या पाकिस्तानच्या हाती चव्हाण यांच्या रूपाने ‘मौल्यवान सावज’ (प्राइज कॅच) हाती पडल्याची भीती सुरक्षा वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

‘‘चुकून सीमा ओलांडलेल्या जवानाच्या सुटकेसाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आम्ही पाकिस्तानशी बोलत आहोत. लष्करी कारवाईच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) गुरुवारीच पाकच्या डीजीएमओंना त्याची कल्पना दिली आहे,’’ असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग, ‘डीजीएमओ’ लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग, इंडो तिबेट सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते.

विशेष म्हणजे, राजनाथांनी या जवानाचे नाव घेण्याचे टाळले. लष्करानेही गुरुवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये या जवानाचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. पाकिस्तानी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये मात्र जवानाचे नाव चंदू बाबूलाल चव्हाण (वय २३) असे जाहीर करण्यात आले. तेव्हापासून चव्हाण यांच्याबद्दलची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, ते ‘३७ राष्ट्रीय रायफल्स’चे जवान असून मूळचे धुळे जिल्ह्य़ातील बोरविहीरचे आहेत. त्यांचे बंधू राजेंद्र हेही लष्करात असून सध्या राजस्थानमध्ये तैनात आहेत.

‘‘या जवानाचा आणि सर्जिकल स्ट्राइक्सचा काहीएक संबंध नाही. लष्कराच्या पथकामध्ये झालेल्या किरकोळ घटनेमधून चव्हाण हे नियंत्रणरेषेजवळ गेले आणि त्यांनी ती अनवधानाने ओलांडली. तेथील गावकऱ्यांनी त्यांना तातडीने पाक लष्कराच्या ताब्यात दिले. त्याचा गैरफायदा घेऊन सर्जिकल स्ट्राइक्स करणाऱ्या भारतीय पथकातील एका जवानाला जिवंत पकडल्याच्या कंडय़ा पाक लष्कराने पिकविल्या. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी त्यांना असे आयते कोलीत हवेच होते. आता हा जवान त्यांच्यासाठी मौल्यवान झाला असल्याने ते त्याला सहजासहजी सोडणार नाही,’’ असे सूत्रांनी सांगितले. त्याला सध्या निकायल तुरुंगात ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.

तीन वर्षांपूर्वीच लष्करात भरती..

राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत असणारा चंदू चव्हाण तीन वर्षांपूर्वी लष्कराच्या चिलखती दलात भरती झाला. अहमदनगर येथे प्रशिक्षण घेतले. तो लहान असतानाच आई-वडिलांचे अपघाती निधन झाले. चंदूला एक भाऊ व विवाहित बहीण आहे. तिघा भावंडांचा त्यांच्या आजी-आजोबांनी सांभाळ केला. बोरविहीर या गावात चंदू चव्हाण आणि त्यांच्या भावंडांचे बालपण गेले. त्यांचे आजोबा हे निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी आहेत. चंदूचा भाऊ  भूषणदेखील सैन्यात गुजरातमध्ये जामनगर येथे कार्यरत आहे. मूळचे जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील असणारी ही भावंडे आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर मामाकडे (बोरविहीर) येथे शिक्षणासाठी आली. शेतीकाम शिकताना चंदूने लष्करात नोकरी मिळवली. चंदू लवकरच सुट्टीवर येईल, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती.

बोरविहीरचिंताग्रस्त; वृत्त ऐकून चंदू चव्हाण यांच्या आजीचा मृत्यू

गस्ती दरम्यान अनवधानाने नियंत्रण रेषा ओलांडल्याने पाकिस्तानी लष्कराच्या हाती सापडलेला भारतीय लष्करातील चंदू बाबुलाल चव्हाण (२२) हा जवान जिल्ह्य़ातील बोरविहीरचा असल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण गाव चिंताग्रस्त झाले आहे. नातवाला शत्रूने पकडल्याचे वृत्त ऐकून त्याच्या आजीचा अकस्मात मृत्यू झाला.

या गावाची ओळख सैनिकांचे गाव अशी आहे. चंदू पाकिस्तानमध्ये अडकल्याच्या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्य़ावरच चिंतेचे सावट पसरले आहे. राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत असणारा चंदू चव्हाण टट्टापाणी सीमावर्ती भागात गस्त घालत असताना पाकिस्तानी हद्दीत गेल्याचे सांगितले जाते. चंदूचा भाऊ  भूषण हादेखील लष्करात आहे. गुजरात येथे कार्यरत असणाऱ्या भूषणकडे आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) राहायला गेल्या होत्या. चंदू बेपत्ता झाल्याचे लष्करी यंत्रणेच्या निदर्शनास आल्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. गावातच असणारे त्यांचे आजोबा चिंधा धोंडू पाटील यांच्या भ्रमणध्वनीवर चौकशी सुरू झाली. चंदूचा भाऊ  भूषण यांच्याकडेही अशीच चौकशी सुरू झाली होती. सातत्याने चाललेल्या चौकशीने आजी लीलाबाई अस्वस्थ झाल्या. मध्यरात्री त्यांचे अचानक निधन झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. आजी लीलाबाई पाटील यांचा मृतदेह गुजरातहून गावी आणण्यात येणार होता. एकीकडे चंदू पाकिस्तानच्या तावडीत सापडल्याची चिंता, तर दुसरीकडे आजीचे झालेले निधन अशा दु:खाच्या दुहेरी फेऱ्यात चव्हाण कुटुंबीय सापडले आहेत. ३२०० लोकसंख्येच्या  बोरविहीर गावात जवळपास १०० घरातील तरुण लष्करी सेवेत आहेत.