बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून सुटका होण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी आपल्या कुटुंबावर सध्या कर्जाचा डोंगर असून आपण कसे या परिस्थितीशी सामना करत आहोत हे दाखवून देण्यास सुरूवात केली आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून स्वत:चे आर्थिक नुकसान झाल्याचे दाखवायला सुरुवात केली आहे.
भांडवली बाजारातील गुंतवणुकीत नुकसान, अनेक बिल्डर, नेते आणि बॉलीवूड कलाकारांना दिलेली मोठी कर्जे बुडीत खात्यात गेल्याने झालेले नुकसान अशा पुष्टी जोडून सिंह यांनी बचावात्मक खेळी करण्यास सुरूवात केली आहे. तसेच मुंबईतील बेनामी सदनिका आणि तब्बल १०१ धनादेश आपल्या वाढदिवसाला गिफ्ट्सम्हणून देण्यात आल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांची नावे यामध्ये आहेत. याबाबत कृपाशंकर यांना विचारले असता हे न्यायालयीन प्रकरण असल्याने यावर प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
आरोपत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, कृपाशंकर यांची पत्नी मालतीदेवी यांनी २००८ साली मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) ट्रेडिंग करण्यास सुरूवात केली होती. यामध्ये मालतीदेवी यांना ३७ लाखांचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, वास्तवात मालतीदेवी यांना कमोडिटी एक्स्चेंजमधील व्यापाराचे शिक्षण आणि अनुभव अजिबात नाही. सिंह यांचा मुलगा नरेंद्रमोहन मालतीदेवी यांच्या नावाने ट्रेडिंग करत असे कारण, आईच्या नावे केलेले ट्रेडिंग आपल्यासाठी लकी असल्याचे नरेंद्रमोहन याचे म्हणणे आहे.
इतकेच नव्हे तर, नरेंद्रमोहन याने बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला २५ लाखांचे कर्ज दिल्याचीही माहिती या आरोपपत्रात आहे. तसेच वांद्र पश्चिम येथील अॅक्वामरिन सोसायटीतील दोन सदनिकांच्या खरेदीतील मालतीदेवी आणि नरेंद्रमोहन यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह आरोपपत्रात उपस्थित करण्यात आले आहेत. या सदनिका नंतरहून सलमान खानचे कुटुंबिय सलमा आणि सलिम खान यांनी विकत घेतल्या आहेत. वांद्रे पूर्व येथील साई प्रसाद सोसायटीमधील तीन सदनिका देखील सिंह कुटुंबियांच्या नावावर असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.