केंद्रातील मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्ष आणि विविध व्यासपीठांवरून काही अर्थतज्ज्ञ मंडळींकडून टीकेची झोड उठवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय चार्टर्ड अकाऊंटंट्स इन्स्टिट्युटने (आयसीएआय) या निर्णयावर ‘सावध’ भूमिका घेतली आहे. संस्थेच्या सदस्यांनी कोणत्याही व्यासपीठावर मते व्यक्त करताना सावधानता बाळगावी. टीका करू नये. तसेच त्यांच्या ग्राहकांना सल्ला देताना अथवा त्यासंबंधी लिहिताना कोणतीही नकारात्मक मते नोंदवू नयेत, अशा सूचना संस्थेतर्फे देण्यात आल्या आहेत.

 

ca

मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सुरू झालेल्या चलनकल्लोळावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. संसदेचे कामकाजही या नोटाबंदीच्या निर्णयामुळे योग्यरितीने होऊ शकलेले नाही. काही अर्थविषयक विश्लेषकांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी या निर्णयावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हा निर्णय मूर्खपणाचा अथवा जनतेला आर्थिक अडचणींच्या दरीत ढकलणारा आहे, अशी टीका विरोधकांकडून होते आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय चार्टर्ड अकाऊंटंट्स इन्स्टिट्युटने सावध पवित्रा घेतला आहे. नोटाबंदीबाबतच्या निर्णयावर संस्थेच्या सदस्यांनी स्वैरपणे कोणतेही विरुद्ध मत नोंदवू नये. लेख अथवा मुलाखतींच्या माध्यमातून नकारात्मक लिखाण अथवा मते व्यक्त करू नयेत, असे ‘फर्मान’च सोडले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर संस्थेच्या सदस्यांनी अशा प्रकारची ‘गैरकृती’ केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना संस्थेने नोटीस बजावली आहे. शिस्तभंग करणाऱ्या सदस्यांवर संस्थेतर्फे कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात ‘गैरकृती’ करणाऱ्या संबंधितांविरोधात तातडीने कारवाई करण्यासाठी संस्थेने पावले उचलली असून, संबंधितांची चौकशी करण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

संस्थेने पत्रकात नोटाबंदीच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे निश्चितच अर्थव्यवस्थेत मोठी प्रगती होईल. तसेच यामुळे काळ्या पैशांवाल्यांना मोठा हादरा बसला आहे. सरकारच्या या साहसी पावलामुळे काळा पैसा बाहेर येईल. इतकेच नव्हे तर सीमेपलिकडील बोगस नोटांचा उद्योग आणि देशविरोधी कारवाया रोखल्या जातील, अशा विश्वासही संस्थेने व्यक्त केला आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखणाऱ्या सरकारच्या या निर्णयाला आमचा कायमच पाठिंबा राहील, असेही संस्थेने म्हटले आहे.