फ्रीडम २५१ या जगातील सर्वात स्वस्त मोबाईल फोनचा निर्माता मोहित गोएल आठवी नापास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहित गोएल हा रिंगिंग बेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. रिंगिंग बेल्स या कंपनीने गेल्यावर्षी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असा गवगवा करत भारतात ‘फ्रीडम २५१’ची जाहिरातबाजी केली होती. अवघ्या अडीचशे रुपयांत स्मार्टफोन मिळणार हे ऐकल्यानंतर लाखोंच्या संख्येने ग्राहकांनी त्यासाठी नोंदणी सुरू केलेली. यावरून बराच वादही झाला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अयाम एंटरप्रायजेसने १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी  मोहित गोएलविरोधात तक्रार दाखल केली  होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुरूवारी रात्री गोयल यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहित गोएल यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. गोयल यांनी पोलिसांना आपण केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे सांगितले. पण त्यांनी लिंक्डइन प्रोफाईलवर अॅमिटी आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठातून व्यवस्थापन क्षेत्राचे शिक्षण घेतल्याचे नमूद केले होते. त्यामुळे गोएल यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना दिलेल्या कबुलीने अनेकांना धक्का बसला आहे. मी केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतले असून त्यानंतर इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी इंग्लिश स्पिकिंग कोर्स केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस सध्या याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

‘फ्रीडम २५१’ या मोबाईलच्या वितरणासाठी नोव्हेंबर २०१५ मध्ये रिंगिग बेल्सने अयाम एंटरप्रायजेस या कंपनीशी संपर्क साधला होता. आम्ही रिंगिंग बेल्सला ३० लाख रुपये दिले होते. पण त्यांच्याकडून फक्त १६ लाख रुपयांचाच माल पुरवण्यात आला. पाठपुरावा केल्यावर आम्हाला एकूण १४ लाख रुपयांचा माल पुरवण्यात आला. पण उर्वरित १६ लाख रुपयांची मागणी केली असता आम्हाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असे अयाम एंटरप्रायजेसने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते.

रिंगिग बेल्स या कंपनीचा ‘फ्रीडम २५१’ हा मोबाईल वादग्रस्त ठरला होता. कितीही कमी खर्चात मोबाइल विकसित केला तरी तो कमीत कमी २७०० रुपयांमध्ये बनू शकतो. यामुळे २५१ रुपयांमध्ये फोन बनणे शक्यच नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही केली जात आहे. विशेष म्हणजे वादाच्या भोव-यात अडकूनही ‘फ्रीडम २५१’ हा फोन विकत घेण्यासाठी देशभरातून तब्बल सात कोटी ग्राहकांनी नोंदणी केल्याचा दावा कंपनीने केला आहे. यातील फक्त ७० हजार ग्राहकांनाच फोन देण्यात आले आहे. तर उर्वरित ग्राहकांना फोन मिळणार की नाही याविषयी संभ्रम आहे. रिंगिग बेल्स ही कंपनी बंद होणार अशी चर्चाही आता सुरु झाली आहे.