देशामध्ये बलात्काराच्या घटनासमोर येत असताना एका महिलेला बलात्काराची शिकार होण्यापासून वाचविण्यासाठी एका तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री चन्नईमधील अलांदुर परिसरात एका महिलेवर तीन नराधम बळजबरी करत होते. तिच्यावर होणारा अत्याचार पाहून या महिलेला वाचवण्यासाठी तरुणाने जीवाची पर्वा न करता त्या तीन नराधमाशी भिडण्याचा धाडसी निर्णय घेतला. बलात्कारासारख्या गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन वसंथा पॉल नावाच्या तरुणाने या महिलेची मदत केली. दरम्यान, यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जखमी अवस्थेतील फोटो या तरुणाने  फेसबुकवर पोस्ट केले आहेत. तसेच अशा घटनेतून मागे न हटण्याचा संदेश वसंथाने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. बऱ्याचदा आपल्या सभोवताली अशी घटना घडत असताना आपण अशा घटनेत हस्तक्षेप करणे टाळत असतो. बलात्कार पीडितेला वाचविण्याची ही घटना सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे.