बिहारमधील छपरा येथील पोषण आहारातून झालेल्या विषबाधेप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. सदोष मनुष्यवध आणि गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजी दाखवल्याप्रकरणी न्यायालयाने मुख्याध्यापिकेला ही शिक्षा सुनावली आहे.
छपरामधील गंडामन प्राथमिक शाळेत २०१३ मध्ये पोषण आहारातून विषबाधा झाला होता. या घटनेत २३ चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी छपरा सत्र न्यायालयाने शाळेच्या मुख्याध्यापिका मीना देवी यांना हत्येच्या कलमातून दोषमुक्त केले. पण सदोष मनुष्यवध आणि गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. मीना देवी यांच्याविरोधात हत्येच्या गुन्ह्याप्रकरणी सबळ पुरावे असल्याचा पोलिसांचा दावा होता. मात्र न्यायालयाने पोलिसांचा दावा फेटाळून लावला होता. २५ ऑगस्टरोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मीना देवीला दोषी ठरवले होते.
सोमवारी न्यायालयाने मीना देवीला शिक्षा सुनावली. न्यायालयाने मीना देवीला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मीना देवीच्य पतीची मात्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सुटका केली आहे. घटना घडली गंडामन प्राथमिक शाळेत पुस्तक वाटली जाणार असल्याने नेहमीपेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी शाळेत हजर होते. मात्र दुर्दैवाने त्याच दिवशी सोयाबन करी आणि भातमधून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. २०१३ मध्ये झालेल्या या घटनेनंतर छपरा येथील शाळांमधील विद्यार्थ्यांनी शाळेतले पोषण आहार घेण्यास नकार दिला होता. घटनेनंतर गंडामन प्राथमिक शाळा महिनाभर बंद होती. शेवटी शाळेचे अन्यत्र स्थलांतर करावे लागले होते. २०१५ मध्ये शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण करुन शाळा पुन्हा एकदा त्याच ठिकाणी सुरु करण्यात आली होती.