छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून ट्विट करून महाराजांना नमन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
मोदी यांनी एकामागोमाग एक असे चार ट्विट मराठीतून केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते एक उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते. शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील आहोत, असे म्हणत त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे झालेल्या शिवस्मारकाच्या जलपूजनाची आठवणही सांगितली. नुकतेच अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकाचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा दिवस सदैव स्मरणात राहील, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.