एका पाकिस्तानी हॅकरने मंगळवारी छत्तीसगढ पोलिसांचे संकेतस्थळ हॅक केल्याची घटना घडली. हॅकरच्या करामतीमुळे छत्तीसगढ पोलिसांच्या संकेतस्थळावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज झळकत होता. संकेतस्थळ सुरक्षित करण्याच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये कमतरता राहिल्याने हा प्रकार घडल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान, सध्या हे संकेतस्थळ तात्पुरत्या वेळेसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत असून त्यामुळे भारत आणि पाकिस्तानयांच्यात सायबर युद्ध तर सुरू नाही ना, अशी शंका उत्त्पन्न झाली आहे. छत्तीसढच्या रायपूर भागात मंगळवारी दिवसभरात तब्बल २४ संकेतस्थळांवर हॅकर्सकडून ताबा मिळविण्यात आला. यापूर्वी एका पाकिस्तानी हॅकरने रायपूरमधील एनआयआयटी या संस्थेचे संकेतस्थळ हॅक केले होते.  त्यानंतर रायपूरच्याच एका हॅकरने पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक केले होते.