केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी आज (सोमवार) लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर पलटवार करत व्यक्तीकेंद्रीपणाने किंवा लोकप्रियतेने देश चालत नसल्याचे म्हटले.
तसेच याआधी नरेंद्र मोदींनी हावर्ड विद्यापीठावरून चिदंबरम यांच्यावर टिप्पणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना चिदंबरम म्हणाले की, माझ्या आईने आणि हावर्डने मला परिश्रम करण्यास शिकविले आहे. जनतेला एकतेच्या भावनेने जे सरकार काम करते त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे आणि याच ‘हाता’ची निशाणी असलेल्या काँग्रेस पक्षाकडेच एकात्मतेने काम करण्याची कुवत आहे असेही चिदंबरम म्हणाले.
याआधी चिदंबरम यांच्यावर निशाणा साधत नरेंद्र मोदी म्हणाले होते की, अर्थमंत्री हावर्ड विद्यापीठातून शिकून आले आहेत. पंतप्रधान देखील अर्थशास्त्रज्ञ आहेत पण, माझ्याकडे तसे काही नाही पण कठोर परिश्रम माझ्याकडे आहेत. सर्वसाधारण शाळेत गेलेली, रेल्वेत चहा विकलेली आणि हावर्डचे गेटसुद्धा पाहिले नसलेल्या व्यक्तीने अर्थव्यवस्था कशी चालवायची हे दाखवून दिले आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवा देशाच्या विकासासाठी आपल्याला हावर्ड हवा आहे की हार्डवर्क?