फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग नेहमीच त्याच्या विचारसरणीसाठी आणि वेगळ्या दृष्टीकोनासाठी चर्चेत असतो. मार्कने इतक्या कमी वयात संपादन केलेलं यश पाहता आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही ख्यातनाम व्यक्तींच्या यादीत त्याच्या नावाचा उल्लेख केला जातो. मार्कने नुकतीच त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये त्याने नवा दृष्टीकोन मिळण्यासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचे नेमके काय बेत असणार आहेत यावरुन पडदा उचलला आहे.

फेसबुकच्या कक्षा रुंदावत काही नव्या लोकांशी जोडलं जाण्यासाठी मार्कने हे पाऊल उचललं आहे. पोस्टमध्ये लिहिल्यानुसार येत्या काळात मार्क काही अशा ठिकाणांना भेट देणार आहे ज्या ठिकाणांना त्याने आधीच कधीच भेट दिली नव्हती. या पोस्टमध्ये मार्कने त्याचे काही अनुभवही लिहिले आहेत. ‘माझ्या काही प्रवास दौऱ्यांमध्ये मी त्या प्रवासातून काय शिकलो असं मला सतत विचारलं जायचं. पण, माझं मत मांडायचं झालं तर, मला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यांची सुरुवात मी काही सर्वसामान्य मुद्द्यांपासून करणार आहे.’

विविध लोकांसोबत आपण ज्यावेळी जोडलो जातो त्या नात्यांचा आपल्या सामाजिक जीवनावरही कशा प्रकारे परिणाम होतो हे पटवून देण्यासाठी मार्कने तीन गोष्टी शेअर केल्या आहेत. आयुष्यात आजवर भेटलेल्या काही व्यक्तींनी आपल्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम केला, हेसुद्धा त्याने या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय. ‘कोणत्याही प्रकाची नाती किंवा माणसांसोबत जोडलं जाणं हे कधीही सुकर असतं, ज्यामुळे आपण काही चांगल्या सवयी शिकतो, संकटांपासून सहसा दूर राहतो, चांगल्या संधीचा शोधात जातो.’ असं मार्कने या पोस्टमध्ये लिहिलंय.

‘आपण फार कमी व्यक्तींना मदतीचा हात देतो ज्याचा सामाजावर सकारात्मक परिणाम होतो, ही बाब नाकारता येणार नाही, असं म्हणत आपण जास्तीत जास्त लोकांशी जोडलं जाणं गरजेचं आहे, जेणेकरुन काही संधी आणि आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपण सर्वजण प्रगतीशील वाटचाल करु शकू’, असा विश्वासही मार्कने व्यक्त केला. त्यासोबतच ज्यांनी- ज्यांनी त्यांच्या कक्षा रुंदावत काही नव्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा सर्वांनाच त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठीही त्याने प्रेरित केलं आहे.