दिल्लीचे मुख्य सचिव एम. एम. कुट्टी हे भाजपचे गुप्तहेर असल्याप्रमाणे काम करीत आहेत, असा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.  

दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे मुख्य सचिव काम करीत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. मुख्य सचिव असल्याने कुट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश किंवा सुचनांचे पालने करणे अपेक्षित आहे. मात्र, कुट्टी हे मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने भाडेवाढ केल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश केजरीवालांनी मुख्य सचिवांना दिले होते. मात्र, ही चौकशी करण्यास मुख्य सचिव कुट्टी यांनी ठाम नकार दिला. त्यामुळे भडकलेल्या केजरीवालांनी कुट्टी यांना समन्स पाठवून आदेशाचे पालन न करण्याबाबत उत्तर मागवले आहे. मुख्य सचिवांच्या या वागणुकीवरून ते भाजपच्या इशाऱ्यावरच आपल्याला त्रास देत असल्याचा गंभीर आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

या प्रकरणी केजरीवालांनी केंद्रीय गृह आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनाही पत्र लिहीले होते. यावर त्यांना उत्तरादाखल सांगण्यात आले होते की, जर केजरीवालांना ही भाडेवाढ थांबवायची असेल तर दिल्ली सरकारला मेट्रो प्रशासनात दरवर्षी होणारी ३००० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल.

मुख्य सचिव कुट्टी यांच्यावर केजरीवाल नाराज असून यापूर्वीही कुट्टी यांना त्यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. नुकताच २ ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटवर आयोजित श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात कुट्टी गैरहजर राहिले होते. यावरुन केजरीवाल यांनी अनुपस्थितीबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिवांनी उपस्थित राहणे अपेक्षित असतानाही त्यांनी दांडी मारली होती.