पुढील महिन्यात नाशिकमध्ये सुरू होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी औपचारिकपणे फडणवीस यांनी मोदी यांना कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री प्रकाश मेहता आणि गृह राज्यमंत्री रणजित पाटील हे फडणवीस यांच्यासोबत उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या तयारीची माहिती गिरीश महाजन यांनी पंतप्रधानांना दिली.
तत्पूर्वी, केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी, अटल नागरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन (अमृत) आणि सर्वांसाठी घर योजनांची औपचारिक घोषणा गुरुवारी करण्यात आली. या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमानंतरच त्यांनी पंतप्रधानांच्या सात रेसकोर्स रोड येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली का, याची माहिती मिळालेली नाही.