तिन्ही दलप्रमुखांना संरक्षणमंत्र्यांची सूचना
सशस्त्र दलांत महिलांचा अधिकाधिक समावेश होण्यासाठी काय करणे शक्य आहे या बाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांना
केली आहे. महिलांचा सहभाग वाढण्याच्या मार्गात कोणती आव्हाने आहेत आणि त्यासाठी कोणते पायाभूत बदल गरजेचे आहेत त्याचाही अंतर्भाव अहवालात
करावा, असेही पर्रिकर यांनी म्हटले आहे.
सशस्त्र दलात महिलांची केवळ संख्याच वाढविणे हे उद्दिष्ट नाही तर प्रसंगी हल्ले करण्याची कामगिरीही त्यांच्यावर सोपविता आली पाहिजे, असे पर्रिकर यांचे मत आहे. तीनही दलांच्या प्रमुखांसमवेत अलीकडेच त्यांची बैठक झाली त्यामध्ये त्यांनी हे मत मांडले.
महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याचे मार्ग सुचविण्याबरोबरच या कामात येणारी आव्हाने आणि गरजेनुसार कोणते बदल करावे लागतील याचा सविस्तर अहवाल तयार करण्यास प्रमुखांना सांगण्यात आले आहे, असे संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले.
हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांची भरती करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती हवाई दलप्रमुख अरूप राहा यांनी दिल्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत. त्यापाठोपाठ नौदलप्रमुख आर. के. धोवन यांनीही, नौदलाच्या टेहळणी विमानांसाठी महिला वैमानिकांची भरती करण्याची शक्यता बोलून दाखविली. तथापि, सरकारी नियमांमुळे महिलांना प्रत्यक्ष हल्ल्याची कामगिरी देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.