‘एनसीपीसीआर’ अध्यक्षांचे मत
अत्यंत निर्घृण गुन्हय़ांमध्ये बालगुन्हेगारांचा सहभाग असल्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल एनसीपीसीआर या राष्ट्रीय बाल हक्क संस्थेच्या अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. उद्ध्वस्त कुटुंब आणि आर्थिक ओढाताण ही प्रमुख कारणेच याला जबाबदार आहेत, असेही अध्यक्षांनी म्हटले आहे.
बहुसंख्य बालगुन्हेगार हे आर्थिक स्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळतात, मात्र त्यापेक्षाही उद्ध्वस्त कुटुंब हे त्याचे मुख्य कारण आहे. लैंगिक छळ, असहायता, राग यामुळे अशी स्थिती निर्माण होत असल्याचे बालहक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा स्तुती कॅकर यांनी म्हटले आहे.
बालगुन्हेगारांनी केलेले गुन्हे पाहता न्यायपालिकेला एका विशिष्ट मार्गाने जाण्याची गरज आहे, असे कॅकर म्हणाल्या. रस्त्यावरील मुलांच्या हक्कांबाबत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
बालगुन्हेगार कायदा याबाबत सुस्पष्ट आहे. वयाच्या १६ व्या वर्षांनंतर एखाद्या मुलाने निर्घृण कृत्य केले तर त्यावर कारवाई करण्याचे विशिष्ट मार्ग आहेत, त्यांचा मेंदू विकसित होत असतो, काही मुलांमध्ये लवकर परिपक्वता येते, तर काहींना वेळ लागतो, त्यामुळे न्यायव्यवस्थेने ठोस मार्गानेच गेले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
रेल्वे स्थानके आणि फलाटांवर अशा प्रकारची मुले आढळल्यास त्यांना कशी मदत करावी याचे प्रशिक्षण एनसीपीसीआरने रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने कर्मचारी आणि पोर्टर आणि हमालांना देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.