बालविवाह हा बलात्कारापेक्षाही सामाजिक गुन्हा असून त्याचे समूळ उच्चाटन झालेच पाहिजे, असे मत दिल्लीच्या न्यायालयाने मांडले आहे. एका लहान मुलीच्या आईवडिलांनी अल्पवयीन मुलाबरोबर तिचा विवाह करण्याचा घाट घातला असता, हे मत मांडून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
हुंडय़ाप्रकरणी याच मुलीचा छळ होत असल्यासंदर्भात तिच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींविरोधात न्यायालयात खटला दाखल केला असून महानगर दंडाधिकारी शिवानी चौहान यांनी उपरोक्त आदेश दिले. हुंडा देणे आणि घेणे या दोन्ही बाबी कायद्यानुसार गुन्हा असून बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधितांविरोधात खटला दाखल करण्याचे आदेशही न्या. चौहान यांनी पोलिसांना दिले. सदर मुलगी केवळ १४ वर्षांची असल्यामुळे तिच्या आईवडिलांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि हुंडाविरोधी कायद्यान्वये खटला भरण्याची सूचना न्या. चौहान यांनी केली.
बालविवाह हा बलात्कारापेक्षाही भयावह असून समाजातून त्याचे उच्चाटन केलेच पाहिजे. अशा गुन्हेगारांविरोधात सरकारने योग्य ती कारवाई केल्याखेरीज हे शक्य होणार नाही, असेही न्या. चौहान यांनी बजावले.