dv02गेले कित्येक महिने सीरिया हा देश संघर्षांने धगधगत आहे. रोजच्या त्या हिंसाचाराने तेथील लहान मुलांचे बालपणच खुडून टाकले आहे. अनेक मुले त्यात बळी पडत आहेत आणि उरलेल्यांना युद्धभोग भोगावे लागत आहेत. शाळा, रुग्णालये, अनाथालये बॉम्बहल्ल्यांत उद्ध्वस्त होताना पाहावे लागत आहे. पुस्तके आणि कार्टून मालिकांऐवजी त्यांना बॉम्ब नि बंदुका आणि इंद्रधनुष्याच्याऐवजी आकाशव्यापी धूर बघावा लागत आहे. वृत्तछायाचित्रकार नादिया अबू शाबान यांनी अलीकडेच अशाच एका बालिकेचे छायाचित्र टिपले. ते सीरियातील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे छायाचित्र त्यांनी ट्विट केले आणि पाहता पाहता ते सर्वत्र पसरले. या छायाचित्रात ती मुलगी आपले दोन्ही हात वर करताना दिसते. ती शरणागतीची मुद्रा आहे. नादिया यांनी तिच्या दिशेने कॅमेरा रोखल्याबरोबर भयाने तिने दोन्ही हात वर केले. कोणी बंदूक रोखली की असे हात वर करतात हे त्या बिचारीला माहीत. तिला वाटले तो कॅमेरा म्हणजे बंदूकच आहे.
(छायाचित्र सौजन्य : @NadiaAbuShaban/Twitter)