भारतात नुकत्याच सत्तारूढ झालेल्या सरकारसमवेत सर्व क्षेत्रांत बळकट भागीदारी करण्यावर चीनचे पंतप्रधान ली केक्विआंग यांनी भर दिला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना प्रतिसाद देत भारत चीनसमवेत कोणत्याही मुद्दय़ावर चर्चा करण्यास तयार आहे, असे नमूद केले. दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय संपर्क तसेच विचारांचे आदानप्रदान करण्यावरही उभय नेत्यांनी भर दिला.
मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ली केक्विआंग यांनी प्रथमच त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारताच्या नव्या सत्तारूढ नेतेमंडळींची भेट घेण्यासाठी आपले विशेष दूत म्हणून परराष्ट्रमंत्री वांग यी यांना येत्या ८ जून रोजी भारतात पाठविण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. वांग हे नरेंद्र मोदी यांचे खास अभिनंदन करण्यासाठी भारतात येत असून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांचीही भेट घेतील.
केक्विआंग आणि मोदी यांच्यात गुरुवारी सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. भारतात सत्तेवर आलेल्या सरकारसमवेत सर्व क्षेत्रांत बळकट भागीदारी करण्याची इच्छा असून उभय देशांतील संबंध अधिक चांगले  विकसित व्हावेत, असे केक्विआंग यांनी मोदी यांना सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नवी दिल्ली येथे ही माहिती दिली. भारताच्या परराष्ट्र धोरणात चीनला नेहमीच प्राधान्य राहिले असून उभय देशांमध्ये होणाऱ्या व्यापक आर्थिक सहकार्याचे भारताने स्वागत केले आहे, असे मोदी यांनी केक्विआंग यांना आग्रहपूर्वक सांगितले. चीनसमवेत असलेली सहकार्यात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत सर्व शक्ती पणास लावेल आणि द्विपक्षीय संबंधांमधील कोणत्याही प्रलंबित मुद्दय़ांसंबंधी चर्चा करण्यास आपण नेहमीच तयार राहू. आपल्या नागरिकांचे दीर्घकालीन हित साध्य व्हावे तसेच विकासाचे उद्दिष्ट साध्य व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही मोदी यांनी केक्विआंग यांना दिले.
आपले अभिनंदन केल्याबद्दल मोदी यांनी केक्विआंग यांचे आभार मानले आणि अध्यक्ष झी जिन्पिआंग यांना केक्विआंग यांच्यामार्फत भारतभेटीचे आमंत्रण दिले.