चीन सरकारने भारत सरकारच्या संगणकांवर गेली १० वर्षे पाळत ठेवली होती, असा दावा एका सायबर सुरक्षा गटाने केला आहे. या सरकारी संगणकातील माहिती मिळवणे अवघड असते तरीही चीनने ती मिळवण्यासाठी हेरगिरीचा वापर केल्याचे समजते.दरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग लेई यांनी भारत व आग्नेय आशियातील देशांवर सायबर हेरगिरी केल्याचा इन्कार केला. त्यांनी सांगितले की, चीनने सायबर हॅकिंग करणाऱ्या कुठल्याही गटांना वाव दिलेला नाही तसेच त्यांच्या माध्यमातून सायबर हेरगिरी केलेली नाही.
एपीटी ३० या गटाने सरकारी संगणक यंत्रणेतील माहिती व इतर प्रमाणित इंटरनेट जोडांच्या माध्यमातून जाणारी माहिती चोरली असे सायबर सुरक्षा पुरवठादार असलेल्या फायरआय या कंपनीने म्हटले आहे. भारतीय संशोधकांनाही एपीटी ३० या गटाचा संशय असून त्यांनी भारतीय संस्थांमध्ये असलेल्या संगणकातून माहिती घेतल्याचे त्यांचेही मत आहे. भारतीय हवाई व अवकाश कंपन्या, संरक्षण कंपन्या व दूरसंचार आस्थापने यांच्या संगणकात एपीटी ३० गटाने मालवेअर टाकला होता असा दावा करण्यात आला.
फायरआयने केलेल्या दाव्यानुसार एपीटी ३० या गटाने अधिक पद्धतशीर पद्धतीने पाळत ठेवली व प्रादेशिक माहिती चोरण्याची उद्दिष्टे पूर्ण केली, त्याला चीन सरकारचा पाठिंबा होता असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.
एपीटी ३० गटाने एक मालवेअर त्यासाठी वापरले व  जानेवारी २०१३ ते एप्रिल २०१३ दरम्यान आसियान सदस्य देशांच्या संगणकातील माहिती चोरली १२-२० डिसेंबर २०१२ दरम्यान आसियानची बैठक झाली होती तेव्हाही त्यांनी हा प्रयोग केला होता. सायबर हेरगिरीचे हे प्रकरण असून त्यात आर्थिक, राजकीय व लष्करी माहिती चोरण्यात आली.