चीनची प्रथमच अधिकृतरीत्या कबुली

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानचा हात होता, असे चीनने प्रथमच अधिकृतरीत्या मान्य केले आहे. ‘सीसीटीव्ही ९’ या चीनच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर नुकत्याच प्रसारित झालेल्या माहितीपटात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानी सूत्रधार यांचा मुंबई हल्ल्यांतील सहभाग स्पष्टपणे अधोरेखित केला आहे. त्यावरून उशिरा का होईना पाकिस्तानला आंधळेपणाने समर्थन देण्यात हशील नसल्याचे सत्य चीनला उमगत असल्याचे मानले जात आहे.

चीन सध्या दहशतवादाच्या मुद्दय़ावर जागतिक समर्थन मिळवून आपली प्रतिमा उजळण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या हाफीज सईद याला संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नात चीनने खोडा घातल्याने त्याची दुटप्पी भूमिका उघडी पडत होती. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांचे लष्कर-ए-तोयबा व जमात-उद-दावाचे दहशतवादी हाफीज अब्दुल रहमान मक्की, तल्हा सईद आणि हाफीज अब्दुल रौफ यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी एकमत झाले होते. मात्र चीनने तांत्रिक कारणे पुढे करत त्या तिघांना दहशतवादी घोषित करण्यावर स्थगिती आणली. त्यामागे पाकिस्तानला पाठिंबा देण्याचीच भूमिका होती. चीनच्या या स्थगितीची मुदत ९ जून रोजी संपत आहे. त्या पाश्र्वभूमीवर चीनच्या भूमिकेतील हा बदल लक्षणीय मानला जात आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत पाकिस्तानला आंधळेपणाने पाठिंबा देऊन चालणार नाही, त्यातून आपलीच प्रतिमा डागाळली जात आहे हे सत्य चीनला उमगू लागल्याचे हे लक्षण मानले जात आहे.