भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या चिनी उत्पादनांविरोधात आवाज उठवणाऱ्या योगगुरू रामदेव बाबांनी पुन्हा चीनविरोधात हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानी दहशतवादाला चीनकडून खतपाणी घातलं जात आहे. त्यामुळं भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला, असं आवाहन त्यांनी भारतीय जनतेला केलं आहे.

पाकिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम चीनकडून करण्यात येत आहे. त्यामुळं चिनी उत्पादनांवर भारतीयांनी बहिष्कार घालायला हवा, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. गेल्याच आठवड्यात रामदेव बाबांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन भारतीयांना केलं होतं. तसंच चीननं भारतीय बाजारपेठेतून आता गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले होते. सर्व भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घातला तर चीनला आपल्यापुढे नाक घासावे लागेल, असं ते म्हणाले होते. यापूर्वीही रामदेव बाबा यांनी चीनवर अशाप्रकारची टीका केली होती. भारतात चिनी वस्तूंची विक्री करून चीन बक्कळ पैसा कमावतो आणि पाकिस्तानला मदत करतो, असं रामदेव म्हणाले होते.

डोकलाम परिसरातील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून भारत आणि चीन आमनेसामने उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्धचर्चेचं मोहोळ उठलं आहे. चीननं अनेकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. देशाचे सार्वभौमत्व अखंड ठेवण्यासाठी कितीही मोठी किंमत मोजायला तयार आहोत, असा इशारा चीननं भारताला दिला होता.