काश्मीरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चीनने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काश्मीर संदर्भात पाकिस्तानने मांडलेली भूमिका महत्त्वाची आणि गंभीर असल्याचे चीनने म्हटले आहे. पण त्याचबरोबर या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी चर्चेने आणि परस्पर सामंजस्याने तोडगा काढावा, असेही म्हटले आहे. भारतीय उपखंडातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी ते खूप आवश्यक असल्याचे मत चीनने मांडले आहे.
उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. सार्क परिषदेसाठी पाकिस्तानला जाण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिला. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघातही पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांचा विषय उपस्थित करण्यात आला होता. काश्मीर प्रश्नावर आपली बाजू मांडण्यासाठी पाकिस्तानमधील एका उच्चस्तरिय शिष्टमंडळाने बुधवारी चीनचे परराष्ट्र उपमंत्री लिऊ झेमिन यांची भेट घेतली. या भेटीनंतर चीनने एक निवेदन प्रसिद्ध करत आपली भूमिका मांडली. चर्चेतूनच भारत आणि पाकिस्तानने हा प्रश्न सोडवावा, असे लिऊ झेमिन यांनी या शिष्टमंडळाला सांगितल्याचे निवेदनात म्हटले आहे.
काश्मीरमधील स्थितीवर पाकिस्तानची बाजू काय आहे, याबद्दल तेथील शिष्टमंडळाने लिऊ झेमिन यांना माहिती दिली. त्यांनी दिलेली माहिती झेमिन यांनी शांतपणे ऐकून घेतली, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
काश्मीर प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे, असे चीनला वाटते असे सांगून निवेदनात म्हटले आहे की, एकमेकांशी बोलून आणि चर्चा करूनच या प्रश्नावर तोडगा काढला जाऊ शकतो. दोन्ही देश परस्परांशी संवाद साधून सामंजस्याचे वातावरण निर्माण करतील, मतभेदांवर मार्ग शोधतील आणि परस्परांमधील संबंध सुधारतील, असे निवेदनात लिहिण्यात आले आहे.
काश्मीर प्रश्नावर आपली बाजू जगातील विविध देशांसमोर मांडण्यासाठी तेथील पंतप्रधान नवाज शरीफ यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीनमध्येही शिष्टमंडळ पाठविण्यात आले होते.