शक्तिशाली देशांमध्ये गणला जाणारा चीन देशातील २० ते ४५ वर्षे वयातील तरुणांना स्पर्म डोनेट करण्याचे आवाहन करतो आहे. देशासाठी कृपया स्पर्म डोनेट करा, असे आवाहन चीन सरकारने आपल्या देशातील तरुण वर्गाला केले आहे. चीन सध्या देशातील स्पर्म बँकांमधील स्पर्मच्या कमतरतेचा सामना करतो आहे. त्यामुळेच चीन सरकारतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे. अलीकडेच चीन सरकारने देशातील लोकांना दोन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी दिली आहे.
आत्तापर्यंत जे चिनी पुरुष स्पर्मदान करत होते त्यातील बरेचसे पुरुष आता वयोवृद्ध झाले आहेत अथवा स्पर्म स्क्रिनिंगमध्ये बाद होत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यामुळे चीन सरकार याकडे येणाऱ्या काळातील संकटाच्या स्वरुपात पाहात आहे. हे संकट लक्षात घेऊन तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आकर्षक योजना राबविण्यात येत आहेत. यात स्पर्म डोनेट करणाऱ्यास १००० डॉलर्स देण्यापासून ते मोफत आयफोनपर्यंतच्या ऑफर्स समाविष्ट आहेत. अनेक स्पर्म बँक देशभक्तीचा नारादेखील लावत आहेत.
एवढे करून देखील खूप कमी प्रमाणावर स्पर्म डोनेशन होईल, असा अंदाज लावला जात आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, स्पर्ममुळे दीर्घायुष्य प्राप्त होते असा चिनी नागरिकांचा समज असल्याने अनेकजण स्पर्मदान करण्यास तयार नाहीत आणि दुसरे म्हणजे अनेक कुटुंबिय अनोळखी व्यक्तीचे स्पर्म वापरण्यास नकार देतात. देशातील तरुणांची घटती संख्या पाहता चीनला काहीना काही उपाय शोधावा लागेल, असे सध्याचे चित्र आहे.