चीनचा  इशारा

सिक्कीममध्ये सुरू केलेले रस्त्याचे काम वैध व कायदेशीर असून तो रस्ता चीनच्याच भागात बांधला जात आहे, तो भाग भूतान व भारत यांच्यापैकी कुणाचाही नाही असा दावा चीनने केला आहे. दुसऱ्या कुणाही देशाला आमच्या रस्ते बांधणीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असेही चीनने स्पष्ट केले. सिक्कीम क्षेत्रातील डोंगलांग भागात रस्त्याचे काम चालू असून त्याला भारताने आक्षेप घेतला आहे.

भूतानचे चीनशी कुठलेही राजनैतिक संबंध नाहीत, त्यामुळे त्या देशाच्या वतीने भारत सिक्कीममधील रस्ते बांधणीस आक्षेप घेत आहे, असा आरोप चीनने केला आहे. भारत चुका दुरूस्त करीत नाही तोपर्यंत नाथुला खिंडीतून कैलास मानसरोवर यात्रेकरूंना प्रवेश देणार नाही असा इशारा चीनने दिला आहे.

डोंगलांग हा चीनचाच भाग असून त्याबाबत कुठलाही वाद असण्याचे कारण नाही. प्राचीन काळापासून हा भाग आमचाच असून भूतानचा नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले. तो भाग भारत किंवा भूतान कुणाचाही नसून आम्ही कायदेशीर बाबी पाहूनच तेथे रस्त्याचे काम सुरू केले आहे, त्यात कुणा देशाने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही.

भूतानच्या सार्वभौमत्वाचा अपमान

भारतावर टीका करताना लू म्हणाले, की भारताने भूतानची बाजू घेण्याची गरज नाही कारण तो सार्वभौम देश आहे. एका देशाने दुसऱ्या देशाचे सार्वभौमत्व जपणे आवश्यक असून चीन-भूतान सीमा वेगळी आहे. त्यामुळे त्रयस्थ देशांनी हस्तक्षेप करण्याचे कारण नाही तसेच त्याबाबत बेजबाबदार विधानेही करू नयेत. जर कुणा त्रयस्थ देशाने यात छुपा हेतू ठेवून हस्तक्षेप केला, तर तो भूतानच्या सार्वभौमत्वाचा अपमान असेल.

१८९० च्या करारानुसार चीनचा दावा

चिकन नेक भागातील सामरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला डोंगलांग हा तीन भाग जोडणारा आहे. सिक्कीमच्या या भागावर भारताला हक्क सांगता येणार नाही, त्यामुळे भारताला रस्त्याच्या कामात अडथळे आणण्याचा अधिकार नाही, असे चीनचे म्हणणे आहे. प्रवक्ते लू यांच्या मते चीनने २०१५ मध्ये नाथुला खिंड भारताच्या कैलास मानसरोवर यात्रेकरूंसाठी खुली केली. चीनच्या मते भारताने रस्त्याच्या कामाला भूतानच्या वतीने आक्षेप घेतला आहे. चीनच्या मते १८९० च्या चीन ब्रिटिश करारानुसार सिक्कीमचा हा सीमेवरील भाग चीनचा असून तेथे रस्ते बांधणी करण्यात चीनने नियमांचे उल्लंघन केलेले नाही. त्या करारानुसार झे हे सिक्कीमचे प्राचीन नाव आहे. ज्या भागावर भारतीय लष्कराने अधिकार सांगितला आहे तो चीनच्या सीमेत आहे. चीनने याबाबत भारताकडे सीमा ओलांडल्याबाबत निषेधाची तक्रार केली होती. भारताने त्या भागातून सैन्य माघारी घेतले तरच कैलास मान सरोवर यात्रेसाठी लोकांना नाथुला खिंडीतून प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका चीनने घेतली आहे.

भारतीय बंकर उध्वस्त

सिक्कीममध्ये भारत-चीन व भूतान यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथे भारताचे काही जुने बंकर होते. ते हटविण्यास चीनने भारतास सांगितले. मात्र भारताने त्यास नकार दिल्याने बुलडोझरचा वापर करून चिनी सैनिकांनी ते उध्वस्त केले, अशी माहिती देण्यात आली.

चीनचे रस्तेकाम भूतानलाही अमान्य 

डोंगलांग भागातील भूतानच्या लष्करी तळाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याचे बांधकाम चीनने तातडीने थांबवावे, अशी मागणी चीनने केली आहे. अशा प्रकारे रस्ता बांधणे हा उभय देशांतील करारांचा भंग आहे, असे भूतानने म्हटले आहे.