चीनने चंद्रावर पाठवलेले निर्मनुष्य अंतराळ यान परत पृथ्वीवर आणण्याची मोहीम यशस्वी केली असून त्यांचे यान सुखरूपपणे पृथ्वीवर उतरले आहे. सोविएत युनियन, अमेरिका यांच्यानंतर परतीची चांद्रमोहीम यशस्वी करणारा चीन हा तिसरा देश ठरला आहे. चाळीस वर्षांपूर्वी अमेरिका व रशियाने अशा मोहिमा यशस्वी केल्या होत्या.
चीनचे चांद्रयान मंगोलिया स्वायत्त भागातील सिझवांग येथे सकाळी उतरले. चांद्रयानाच्या कक्षेत जाऊन नंतर पृथ्वीवर परत येण्यासाठीच ही मोहीम राबवण्यात आली होती. बीजिंगपासून ५०० कि.मी. अंतरावर हे यान परत आलेले सापडले. सोविएत रशियाने यापूर्वी १९७० मध्ये अशी मोहीम यशस्वी केली होती. गेल्या आठवडय़ात शुक्रवारी हे यान पाठवले होते व ते ८,४०,००० कि.मी. अंतर कापून चंद्राच्या कक्षेत गेले. तेथून पृथ्वी व चंद्राची एकत्र छायाचित्रे घेतली.
चीनच्या यानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.१३ वाजता पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला, तेव्हा त्याचा वेग सेकंदाला ११.२ कि.मी होता.
ऑरबायटर प्रकारच्या यानाचा वेग घर्षण कमी व्हावे या उद्देशाने पृथ्वीच्या वातावरणात येताना कमी करण्यात आला होता. त्याच्या पृष्ठभागावर आयननिर्मितीची व्यवस्था होती. त्याचा वेग कमी करून ते पृथ्वीच्या वातावरणात आणण्यात आले.
जर मोटार वेगाने चालवली तर ती थांबवताना जास्त अंतर कापले जाते व ती कमी वेगात असेल तर ब्रेक कमी अंतरात लागतो, असे बीजिंग एरोस्पेस कमांड अँड कंट्रोल सेंटरचे मुख्य अभियंता झाऊ जियान लियांग यांनी सांगितले.