चीनमध्ये दहा सेकंदात पूर्णपणे विद्युतभारित होणारी (चार्जिग) बस तयार करण्यात आली असून ती आज सेवेत दाखल करण्यात आली. निंगबो शहरात या विजेवरील बसचा वापर सुरू झाला आहे. ही बस ११ कि.मी. रस्त्यावर धावते.
झेजियांग प्रांतात निंगबो येथे या बससेवेला एकूण २४ थांबे आहेत. येत्या तीन वर्षांत अशा १२०० बसगाडय़ा सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. या शहरात विद्युत बसगाडय़ा निर्मितीचा प्रकल्पही आहे. बस थांबलेली असताना किंवा प्रवासी चढत-उतरत असताना विद्युतभारित होते. एका विद्युतभारात ही बस पाच किमी अंतर कापते, असे झुझाऊ इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कंपनीचे अध्यक्ष झाऊ क्विंगहे यांनी सांगितले. चीनमधील वेगवान रेल्वे बनवणाऱ्या चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन या संस्थेची ही उपकंपनी आहे. या बस उत्पादनाशिवाय याच धर्तीवर इतर विद्युत वाहनांपेक्षा ३० ते ५० टक्के कमी वीज लागणारी इतर वीज वाहने कंपनी एप्रिलपर्यंत तयार करणार आहे. या बसचे संधारित्र (कॅपॅसिटर) २० लाख वेळा विद्युतभारित करता येते त्यामुळे त्याचा कार्यकाल १० वर्षांचा आहे. या बससेवेत बस रॅपिड ट्रान्झिट पद्धतीच्या मार्गाचा अवलंब केल्याने ती रहदारीच्या अडथळ्यांशिवाय चालू शकते.

* विजेवरील बसची वैशिष्टय़े
प्रदूषण कमी होते.
खासगी वाहनांचा वापर कमी.
१२०० गाडय़ांचा समावेश करणार.
एका विद्युतभार प्रक्रियेत पाच कि.मी. अंतर कापते.
३० ते ५० टक्के कमी वीज लागणारी वाहनेही बनवणार.