मॅकमोहन रेषेपलीकडे चीनने आपल्या ताब्यातील भूभागात रस्तेबांधणी करून वाढविलेल्या दळणवळणाला शह देण्यासाठी मॅकमोहन रेषेच्या अलीकडे अरुणाचल प्रदेशात चीनच्या सरहद्दीला समांतर १८०० कि.मी.चा महामार्ग बांधण्याच्या भारताच्या योजनेस चीनने तीव्र आक्षेप घेतला आहे. उभय देशांतील सीमाप्रश्न सुटला नसताना तो आणखी गुंतागुंतीचा करू नका, असा इशारा चीनने दिला आहे.
अरुणाचल प्रदेशात हा महामार्ग बांधण्याबरोबरच औद्योगिक मुक्तमार्गही तयार करण्याची सरकारची योजना आहे. विशेष म्हणजे चीनच्या धमक्यांना धुडकावून काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारनेही २००८मध्ये ‘ट्रान्स अरुणाचल महामार्ग’ प्रकल्प हाती घेतला होता.
हा नवा महामार्ग अरुणाचलच्या सीमाभागांत संपर्काचे जाळे विस्तारणार आहे.
चीनने या प्रकल्पाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चीनचे परराष्ट्र प्रवक्ते होंग ली म्हणाले की, चीन-भारत सरहद्दीवरील पूर्व भागाच्या ताब्याबाबत उभय देशांत ब्रिटिश राजवटीपासून मतभेद आहेत. ते दूर झाल्याशिवाय या पेचात आणखी भर घालणारे कोणतेही पाऊल भारत उचलणार नाही, अशी आम्हाला आशा आहे. भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगून सीमेवरील गोळीबार थांबवावा आणि चर्चेने आपल्यातील प्रश्न सोडवावा, असा सल्लाही चीनने दिला आहे.
चीनची पावले..
चीनने तिबेटमध्ये मोठय़ा प्रमाणात रस्ताबांधणी, रेल्वे व हवाई सेवा सुरू केल्याने सीमेवर ते सैन्य वेगाने आणू शकतात, अशी भारताची चिंता आहे. चीनची रेल्वे सिक्किम सीमेलगत आली आहे. तिबेट भागांत चीनने पाच विमानतळही सुरू केले आहेत.